गांडूळ खत
रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिबदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
गांडूळ खत म्हणजे काय
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
गांडूळाचे प्रकार
- एपिजिकः ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
- अॅनेसिकः ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.
- एण्डोजिकः ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.
गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती
गांडूळांच्या 300हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.
गांडूळ जीवनक्रम
गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेऊन त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांडूळखत तयार करतात.[ संदर्भ हवा ]
गांडूळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मिती
जागेची निवड व बांधणी
गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे - उपलब्ध होणारे शेणखत व छपरासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छपरामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.
गांडूळ खाद्य
चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.त्याच प्रमाणे घरातील कचरा, सांडपाणी, तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुद्धा वापरता येतो.
शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लॅंन्टमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या आधी गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल.
गांडूळना ग्लिसरडियाचा पाला गांडूळ बेड वर टाकून त्यावर ४ इंच जाडीचा शेणाचा लेप दिल्यास १० पटीने गांडूळ संख्या वाढते.
गांडूळखत करण्याच्या पद्धती
गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.
ढीग पद्धत
ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत.
साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
खड्डा पद्धत
या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.[१]
खत तयार होण्यास लागणारा कालावधी
गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.
गांडूळखत तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी
- गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.
- शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व 15-20 दिवस कुजवावे.
- खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: 15 ते 20 सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.
- गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याआधी 1 दिवस पाणी मारावे.
- गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
- व्हर्मीवाॅश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाॅश जमा करण्याचे नियोजन करावे
गांडूळखत वेगळं करणे
खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे.गांडुळखत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल.ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत.अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतिरीक्त दुसऱ्या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.
गांडूळखताचे फायदे
- जमिनीचा पोत सुधारतो.
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
- गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
- जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- जमिनीची धूप कमी होते.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- जमिनीचा सामू (पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
- गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
- जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
- ओला कचरा व्यावास्तापन पण होते
- मातीचा कस टिकून राहतो
- या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.[ संदर्भ हवा ]
१४. ह्या खतामुळे जमिन सुपीक राहते.
गांडूळ खत आणि कंपोस्ट खताची तुलना
गांडूळ खत | कंपोस्ट खत | |
---|---|---|
कालावधी | 1-1.5 महिना | 4 महिने |
पोषक तत्त्व | ||
नायट्रोजन (N) | 2.5-3.0 टक्के | 0.5-1.5 टक्के |
फाॅस्फरस (P) | 1.5-2.0 टक्के | 0.5-0.9 टक्के |
पोटॅश (K) | 1.5-2.0 टक्के | 1.2-1.4 टक्के |
सूक्ष्म व ईतर पदार्थ | अपेक्षाकृत अधिक प्रमाणात | कमी प्रमाणात |
प्रति एकर आवश्यकता | 2 टन | 5 टन |
वातावरणा वरील | दुर्गंधी व रहित. डास व माशांचा अभाव. नियंत्रित तापमान, त्यामुळे उपयुक्त जिवाणुंची वाढ चांगली होते. | दुर्गंधी आणि प्रदूषणात वाढ. डास आणि माशांचा उपद्रव संभवतो. तसेच तापमानात अनियंत्रित वाढ होते, जेणेकरून उपयुक्त जिवाणू मर्यादित वाढतात |
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Staff, K. J. "गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती". marathi.krishijagran.com. 2020-02-11 रोजी पाहिले.