ज्युडिथ टायबर्ग
ज्युडिथ टायबर्ग ऊर्फ ज्योतीप्रिया (जन्म १६ मे १९०२ - मृत्यू ०३ ऑक्टोबर १९८०) [१] - या एक अमेरिकन योगी होत्या. त्या संस्कृत पंडित, प्राच्यविद्याअभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. द लँग्वेज ऑफ द गॉड्स या पुस्तकाच्या लेखिका म्हणूनही त्या ओळखल्या जातात. लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील इस्ट-वेस्ट कल्चरल सेंटर या केंद्राच्या त्या संस्थापक होत्या. या केंद्राच्या माध्यमातून आजवर अनेक पौर्वात्य, भारतीय योग्यांचा आणि आध्यात्मिक गुरूंचा प्रथम-परिचय अमेरिका आणि पाश्चात्य देशांना झाला आहे. [२]
बालपण
डॅनिश पालकांच्या पोटी जन्माला आलेल्या ज्युडिथ यांच्यावर बालपणी थियोसॉफिकल विचारांचे संस्कार झाले. त्यांच्यावर उपनिषदे आणि गीतेचा प्रभाव होता. लहानवयातच ज्युडिथ यांना भगवद्गीता मुखोद्गत होती.
शिक्षण
- ज्युडिथ यांचे सर्व शिक्षण थियोसॉफिकल विद्यापीठात झाले. लहानपणी टायबर्गने थिओसॉफिकल सोसायटीचे प्रमुख गॉटफ्रीड डी पुरकर यांच्याकडे संस्कृत आणि हिंदू साहित्याचा अभ्यास केला. [३]
- उच्च गणित आणि भाषा या विषयामध्ये त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. लॅटिन, ग्रीक, हिब्रू, जर्मन, डच, फ्रेंच, स्पॅनिश, डॅनिश आणि स्वीडिश या भाषा त्यांना अवगत होत्या.
- धर्म आणि तत्त्वज्ञान हे विषय घेऊन त्यांनी एम.ए ही पदवी संपादन केली. त्यासाठी पौर्वात्य विचार हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता.
- पवित्र शास्त्र आणि प्राचीन संस्कृती या विषयांमध्ये त्यांनी बी.टी. आणि एम.टी. पूर्ण केले. त्यामध्ये त्यांनी बायबल आणि कबालावर विशेष अभ्यास केला. [२]
- ज्युडिथ यांनी १९३० मध्ये गॉटफ्राइड डी पुरकर यांच्या मार्गदर्शनाने संस्कृतचा अभ्यास सुरू केला आणि संस्कृत अभ्यासात पीएच.डी. मिळवली. पुढे त्या अमेरिकन ओरिएंटल सोसायटीच्या सदस्य बनल्या.[२]
कारकीर्द
- ज्युडिथ यांनी राजयोग शाळेतून त्यांच्या अध्यापन कारकिर्दीला सुरुवात केली.
- १९३२ ते १९३५ पर्यंत त्यांनी राजयोग शाळेच्या साहाय्यक प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळली.
- १९३४ मध्ये आध्यात्मिक शब्दसंग्रहाचा विश्वकोश तयार करण्यासाठी डी पुरुकर यांनी स्थापन केलेल्या संघात ज्युडिथ सहभागी झाल्या. तेव्हा त्यांनी ग्रीक, चिनी, कबालिस्ट, झोरोस्ट्रियन, हिंदू आणि बौद्ध ग्रंथांचा अभ्यास केला व त्याद्वारे त्यांनी २००० हून अधिक संज्ञांची भर त्यामध्ये घातली.
- १९४० मध्ये ज्युडिथ या थिऑसॉफिकल युनिव्हर्सिटीच्या संस्कृत आणि प्राच्य विभागाच्या प्रमुख झाल्या आणि कॅलिफोर्नियातील पौर्वात्य तत्त्वज्ञानाच्या मुख्य प्रसारक झाल्या.[३]
- १९३५ ते १९४५ पर्यंत त्यांनी डीन आणि थियोसॉफिकल विद्यापीठाच्या विश्वस्त या नात्याने जबाबदारी सांभाळली.[२]
- काही काळ युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथे काम केल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये स्वतःचे संस्कृत केंद्र व पुस्तकांचे दुकान सुरू केले. तेथे त्या भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती, भाषा आणि धर्म यांचे शिक्षण देत असत.
- १९४६ साली त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे तत्कालीन कुलगुरू डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्याख्यान ऐकले आणि त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. संस्कृत ग्रंथामध्ये नमूद केलेली शिकवण आणि धार्मिक तत्त्वज्ञान यांच्या प्रसारार्थ आपले आयुष्य वेचण्याचा आपला संकल्प आहे, असे त्यात त्यांनी लिहिले होते. त्यांना तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली.आणि अल्पावधीतच त्यांना अखिल भारतीय आर्य धर्म सेवा संघाचे मानद सदस्यत्व देण्यात आले.[२]
प्रकाशित ग्रंथसंपदा
- द लँग्वेज ऑफ द गॉड्स
- संस्कृत किज टू द विस्डम-रिलीजन (१९४१), प्रकाशक - लोमा, कॅलिफोर्निया थिऑसॉफिकल युनिव्हर्सिटी प्रेस [४] या पुस्तकामुळे अमेरिकेला प्रथमच संस्कृतचा परिचय झाला. द लॉस एंजेलिस टाईम्स या वृत्तपत्राने त्याची दखल घेतली. [५]
- फर्स्ट लेसन्स इन संस्कृत ग्रामर अँड रीडिंग (१९६४), प्रकाशक - लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील इस्ट-वेस्ट कल्चरल सेंटर [६]
श्रीअरविंद यांचे मार्गदर्शन
१९४७ साली श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे दर्शन घेण्यासाठी ज्युडिथ यांनी श्रीअरविंद आश्रमाला भेट दिली. ज्युडिथ यांचा श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्याबरोबर पत्र-व्यवहार चालू राहिला.[३] पुढे प्रत्यक्ष भेटीत, आपल्याला आध्यात्मिक नाव देऊ करावे अशी विनंती ज्युडिथ यांनी श्रीमाताजी यांना केली, तेव्हा श्रीअरविंद यांनी ज्योतीप्रिया असे त्यांना नामाभिधान दिले.[२]
जगभरातील धार्मिक साहित्याच्या २५ वर्षांच्या आणि १७ वर्षांच्या संस्कृतच्या अभ्यासानंतर ज्युडिथ या निष्कर्षाप्रत आल्या होत्या की, वेदांमध्ये काहीतरी गहन अर्थ आहे, हा अर्थ सांगू शकेल अशा व्यक्तीच्या त्या शोधात होत्या. आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयातील तेव्हाचे एक प्राध्यापक श्री.अरविंद बासू यांनी ज्युडिथ यांना श्रीअरविंद लिखित सिक्रेट ऑफ द वेद या ग्रंथाचे हस्तलिखित वाचायला दिले. आणि तिथेच ज्युडिथ यांचा शोध पूर्ण झाला. [२]
संदर्भ
संदर्भांची झलक दाखवा
- ^ "Judith Tyberg (Jyotipriya) – Ashrams of India" (इंग्रजी भाषेत). 2025-02-04 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g "Judith Tyberg". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-01-24.
- ^ a b c "Label Curatorial". www.labelcuratorial.com. 2025-02-05 रोजी पाहिले.
- ^ Tyberg, Judith M. (1940). Sanskrit keys to the wisdom-religion; an exposition of the philosophical and religious teachings imbodied in the Sanskrit terms used in theosophical and occult literature. Internet Archive. Point Loma, Calif., Theosophical University Press.
- ^ sriaurobindocenterla
- ^ Tyberg, Judith M. (1964). First lessons in Sanskrit grammar and reading. Internet Archive. Los Angeles, East-West Cultural Center.