तत्त्वज्ञान

भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरुवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे.

तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा असे समजले जाते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा ते शक्यतो सोडवणे हा हेतू तत्त्वज्ञानामागे असतो. अशा प्रकारच्या समस्यांचा विचार करणारे जे इतर मार्ग किंवा इतर ज्ञानशाखा आहेत; त्यापेक्षा अतिशय भिन्न रीतीने होणाऱ्या चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते.

प्रश्न उपस्थित करणे, चिकित्सक चर्चा करणे, विवेकशील युक्तिवाद करणे आणि सुव्यवस्थित सादरीकरण करणे ही सर्वसाधारण तात्त्विक पद्धती मानली जाते. "काहीतरी जाणणे शक्य आहे का? ते सिद्ध करणे शक्य आहे का? वास्तव म्हणजे काय? नीती म्हणजे काय? किंवा "जीवन जगण्याची उत्तम रीती कोणती?" असे प्रश्न तात्त्विक समजले जातात.

भारतीय आणि पाश्चात्य अर्थाने पाहता, मानव स्वतःच्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी असल्याने त्याच्या या आत्मजाणीव असणाऱ्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते.

भिन्न मूलार्थ

'तत्त्वज्ञान' ही संज्ञा इंग्लिशमधील Philosophyचे भाषांतर म्हणून उपयोगात आणली जात असली तरी त्यांचे मूलार्थ वेगवेगळे आहेत. 'तत्त्वज्ञान' आणि Philosophy यात पहिला आणि सहज जाणवणारा फरक असा की 'तत्त्वज्ञान' हा प्राचीन संस्कृत शब्द आहे तर Philosophy हा इंग्लिश भाषेतील शब्द आहे. Philosophy हा इंग्लिश शब्द असला तरी त्याचे मूळ प्राचीन ग्रीक भाषेत आहे. संस्कृत ही वैदिक हिंदूंची भाषा आहे इंग्लिश ही भाषा आहे. या दोन्ही भाषा भिन्न संस्कृतीत विकसित झाल्या. त्यांच्या अर्थात फरक आहे पण तो पूरक मानता येईल.

'तत्त्वज्ञान'ची व्युत्पत्ति

तत्त्वज्ञान ही संज्ञा तत्त्व + ज्ञान अशा संधीने बनते.

तत्त्वज्ञान = तत्त्व + ज्ञान
तत्त्व = तत् + त्व
तत् = ते ( 'ते' हे सर्वनाम)
'तत्'चा तत्पणा (तत्-पणा) = तत्त्व
'तत्त्व'चे ज्ञान = तत्त्वज्ञान
व्याकरण दृष्ट्या 'तत्' + त्व = तत्त्वज्ञान. म्हणजे 'तत्'ला 'त्व' हा भाववाचक प्रत्यय लागून 'तत्त्व' ही संज्ञा बनते. त्यापासून तत्त्वतः, तत्त्वतां = खरोखर हा शब्द बनला. पुढे तत्त्वनिष्ठ = तत्त्वावर निष्ठा असलेला, तत्त्ववादी= तत्त्वाबद्दल वाद करणारा असे शब्द बनतात.[१]तेच तात्त्विक, तत्त्वमसि या संज्ञाबाबत आहे.
येथे' तत्त्व' = म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप किंवा त्याचे सार. म्हणून तत्त्वज्ञान पदार्थाचे यथार्थ ज्ञान. यातील तत्त्व ही संज्ञा तत् + म्हणजे ते. ज्याचा ज्याचा निर्देश 'ते' असा करता येतो ती ती प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना इत्यादी म्हणजे ते अथवा तत्. म्हणून तत् = सर्वकाही, जे अस्तित्वात आहे ते सर्व म्हणजे अखिल विश्व. 'तत्'चे सार = तत्त्व. म्हणून तत्त्वार्थ = सारतत्त्व. सार याचा अर्थ स्वरूप, स्वभाव. मनुष्याचे सार मनुष्यत्व, पशूचे पशुत्व, खुर्चीचे खुर्चीत्व. या साराचे ज्ञान ते तत्त्वज्ञान. 'तत्'चे ज्ञान ते तत्त्वज्ञान.[२]

अन्य व्युत्पत्तिनुसार 'तत्' धातूला क्त प्रत्यय लागतो. म्हणून 'तत्' म्हणजे ताणलेले, विस्तृत किंवा व्याप्त झालेले. अशा 'तत्' पासून तत्त्वं बनतो. 'तत्त्वं'चा अर्थ वस्तुस्थिती. स्थिती बदलते, विस्तारते. अशा 'तत्त्व'चे ज्ञान ते तत्त्वज्ञान. ते यथार्थ असते. म्हणून तत्त्वज्ञान = यथार्थ ज्ञान[३]

तत्वज्ञानाची व्युत्पत्ती

इंग्रजी "philosophy" ही संज्ञा ज्या ग्रीक संज्ञेचा उच्चार Philosophia असा होतो, त्या शब्दापासून बनते.[४] ही संज्ञा ग्रीक φιλοσοφία (philosophia) अशी आहे. Philosophiaचा शब्दशः अर्थ शहाणपण अथवा चातुर्याबद्दल प्रेम,[५][६] असा आहे.

Philosophy = Philos + Sophia Philosophy हा शब्द Philos आणि Sophia यांच्या समासातून बनतो. Philo किंवा Philosचा अर्थ Love आणि Sophia म्हणजे Wisdom. म्हणून Love of Wisdom = Philosophy किंवा मराठीत प्रज्ञानाविषयी प्रेम. Sophiaचे मराठी अचूक भाषांतर "शहाणपण" किंवा "प्रज्ञान" असे करता येते.

प्रज्ञानाचे स्वरूप

साधारणतः आपण प्रेम करतो ते कोणत्यातरी वस्तू अथवा व्यक्तीवर. वस्तू व व्यक्ती यांना रंगरूप, लांबीरुंदी, वजन, आकार, चव, स्पर्श  इत्यादी भौतिक गुणधर्म असतात, ज्यांचा आपल्याला ज्ञानेंद्रियांद्वारे प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणजेच या वस्तू मूर्त, साकार असतात. त्यांच्यावर प्रेम करणे, हे सहज असते. पण मन, आत्मा, ईश्वर, सत्य, शिव, सुंदर, संख्या, गणित इत्यादी अमूर्त निराकार संकल्पनांवर प्रेम करणे कसे शक्य आहे? त्या मानसिक पदार्थ आहेत. ग्रीकांच्या मते, "शहाणपण" ही सुद्धा अशीच मानसिक संकल्पना आहे. तिच्यावर प्रेम करणे, म्हणजे तत्त्वज्ञान.           

व्याप्ती

तत्त्वज्ञानाच्या आजच्या व्याप्तीमध्ये तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो.

ज्ञानमीमांसा

सत्य, विश्वास व समर्थनाचे सिद्धान्तत यांच्यातील संबंध यांसारख्या ज्ञानाच्या स्वरूप आणि व्याप्तीशी संबंधित गोष्टींचा विचार ज्ञानमीमांसेत केला जातो.

तर्कशास्त्र

समुचित कारणमीमांसेच्या तत्त्वांचा विचार तर्कशास्त्रात केला जातो.

तत्त्वमीमांसा

अस्तित्व, काल, मन आणि शरीर यांच्यातील संबंध, वस्तू व त्यांचे गुणधर्म यांच्यातील संबंध, पूर्ण आणि त्याचे अंश यांच्यातील संबंध, घटना, प्रक्रिया व त्यांची कारणमीमांसा अशा वास्तवाच्या सर्वसाधारण गुणांचा किंवा वैशिष्ट्यांचा अभ्यास तत्त्वमीमांसेत केला जातो.

सौंदर्यशास्त्र

सौंदर्य, कला, आकलन, आस्वाद यांचा विचार सौंदर्यशास्त्र करते.

विशेषीकृत शाखा

  • भाषेचे तत्त्वज्ञान
  • कायद्याचे तत्त्वज्ञान
  • मनाचे तत्त्वज्ञान
  • धर्माचे तत्त्वज्ञान
  • विज्ञानाचे तत्त्वज्ञान

नामव्युत्पत्ती

इंग्रजी "philosophy" ही संज्ञा ग्रीक φιλοσοφία (philosophia), (शब्दशः अर्थ शहाणपण अथवा चातुर्याबद्दल प्रेम) या धातूवर बेतलेली आहे.

संदर्भ

  1. ^ कृ. पां. कुलकर्णी, मराठी व्युत्पत्ति कोश, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुरवणी संपादक कै. श्रीपाद जोशी, पुणे पान ३९२, २००४
  2. ^ श्रीनिवास हरि दीक्षित, भारतीय तत्त्वज्ञान, फडके प्रकाशन, कोल्हापूर दहावी आवृत्ती : डिसेंबर २०१०, कोड नं. पी. ५४४८, पान ०१
  3. ^ (कै.) ज. वि. ओक, गीर्वाणलघुकोश, सुधारलेली चवथी आवृत्ती ०१ ऑगस्ट २००२, पान २१९, प्रकाशक – आनंद लाटकर, कॉम्प-प्रिंट कल्पना प्रा. लि. पुणे ३०
  4. ^ "philosophy | Search Online Etymology Dictionary". www.etymonline.com. 2019-08-28 रोजी पाहिले.
  5. ^ Brook Noel Moore, Kenneth Bruder (2005). Philosophy : Power of Ideas. New Delhi: Tata McGraw-Hill Publishing Company. p. 02. ISBN 0070611106.
  6. ^ "Before Philosophy: Myth in Hesiod and Homer" , The Great Conversation: A Historical Introduction to Philosophy. New York: McGraw Hill. 2007. p. 01. ISBN 13:9780195306828, 10:0195306821 Check |isbn= value: invalid character (सहाय्य). |first= missing |last= (सहाय्य)

बाह्य दुवे