धनु (तारकासमूह)
धनू ही दक्षिण खगोलार्धातल्या राशिचक्रातील एक रास आणि ८८ तारकासमूहांतील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजीतील नाव Sagittarius (सॅजिटॅरियस) हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग (धड) घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या (सेंटॉरच्या) आकृतीने ही रास दर्शवली जाते.
आकाशगंगेचे केंद्र धनूच्या पश्चिम भागामध्ये आहे.
वर्णन
हा तारकासमूह पूर्वेला मकर आणि पश्चिमेला वृश्चिक आणि भुजंगधारी तारकासमूहांच्या मध्ये विस्तृत (होरा १७ ता. ४० मि. ते २० ता. २० मि. आणि क्रांती –१२° ते –४५°) पसरला आहे. धनूचे खगोलावरील क्षेत्रफळ ८६७ चौ. अंश आहे. हा तारकासमूह जुलै व ऑगस्टमध्ये रात्री दक्षिणेकडे चांगला दिसतो.
वैशिष्ट्ये
तारे
अल्फा सॅजिटॅरी (α Sgr) हा ३.९६ दृश्यप्रतीचा तारा आहे. याला अल्फा ही संज्ञा असली तरी हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा नाही. यातील सर्वात तेजस्वी तारा एप्सिलॉन सॅजिटॅरी हा असून त्याची दृश्यप्रत १.८५ आहे.[१]सिग्मा सॅजिटॅरि (σ Sgr) हा या तारकासमूहातील दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत २.०८ आहे. हा बी२व्ही प्रकारचा तारा असून तो अंदाजे २६० प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[२] झीटा सॅजिटॅरी (ζ Sgr) २.६१ दृश्यप्रतिचा ए२ प्रकारचा द्वैती तारा आहे ज्याच्या घटकांची दृश्यप्रत ३.३ आणि ३.५ आहे.[३]
डेल्टा सॅजिटॅरी (δ Sgr) के२ प्रकारचा २.७१ दृश्यप्रतीचा तारा आहे. हा पृथ्वीपासून फक्त ८५ प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[३]टा सॅजिटॅरी (η Sgr) द्वैती तारा आहे. त्याच्या घटकांची दृश्यप्रत ३.१८ आणि १० आहे. पाय सॅजिटॅरी (π Sgr) एक तीन ताऱ्यांची प्रणाली आहे. तिच्यातील घटकांची दृश्यप्रत अनुक्रमे ३.७, ३.८ आणि ६.० आहे.[३]
दूर अंतराळातील वस्तू
आकाशगंगेचे केंद्र धनूमध्ये असल्याने त्या भागात आकाशगंगा अतिशय घन आहे. त्यामुळे त्या भागात अनेक ताऱ्यांचे समूह आणि तेजोमेघ आहेत.
तेजोमेघ
धनूमध्ये अनेक प्रसिद्ध तेजोमेघ आहेत. उदा० लॅम्ब्डा सॅजिटॅरी (λ Sagittarii) ताऱ्याजवळील लगून तेजोमेघ (मेसिए ८), ढाल तारकासमूहाजवळील हॉर् सशू तेजोमेघ किंवा स्वॅन तेजोमेघ म्हणूनही प्रसिद्ध असलेला ओमेगा तेजोमेघ (मेसिए १७), आणि ज्याच्यामध्ये तरुण आणि उष्ण तारे आहेत असा एक मोठा ट्रिफिड तेजोमेघ (मेसिए २०)..
- लगून तेजोमेघ (एम८) पृथ्वीपासून ५,००० प्रकाशवर्ष अंतरावरील एक उत्सर्जन तेजोमेघ आहे. त्याचा आकार १४० प्रकाशवर्ष गुणिले ६० प्रकाशवर्ष एवढा आहे. जरी तो उघड्या डोळ्यांनी दुर्बिणीतून पाहिले असता करडा दिसत असला तरी जास्त एक्सपोजरच्या छायाचित्रांमध्ये त्याच्यात गुलाबी छटा दिसतात.[४] त्याची दृश्यप्रत ३.० आहे.[५]
- ओमेगा तेजोमेघ एक तेजस्वी तेजोमेघ असून त्याची दृश्यप्रत ६.० आहे आणि तो पृथ्वीपासून ४८९० प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[६]
- ट्रिफिड तेजोमेघ (एम२०, एनजीसी ६५१४) एक उत्सर्जन तेजोमेघ आहे. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिए यांनी शोधलेल्या या तेजोमेघाचे पृथ्वीपासूनचे अंतर २००० ते ९००० प्रकाशवर्ष आहे आणि व्यास ५० प्रकाशवर्ष आहे.[४] हा एम२० ज्याची दृश्यप्रत ६.३ आहे अशा एका ताऱ्याच्या समूहाशी संलग्न आहे .[७]
- लाल कोळी तेजोमेघ (एनजीसी ६५३७) पृथ्वीपासून ४००० प्रकाशवर्ष अंतरावरील एक ग्रहीय तेजोमेघ आहे.
याव्यतिरिक्त असे अनेक तेजोमेघ धनूमध्ये सापडले आहेत.
इतर दूरच्या वस्तू
१९९९ मधील एका हिंस्रक उद्रेकामुळे पृथ्वीपासून सर्वात जवळील कृष्णविवराचा शोध लागला,[९] पण पुढील तपासातून त्याचे अंतर पहिल्यापेक्षा १५ पट जास्त आहे असा निष्कर्ष निघाला.[१०] धनु अ हा एक रेडिओ स्रोत धनूमध्ये आहे. खगोलशास्त्रज्ञ असे मानतात की, त्याचा एक घटक धनु अ* हा एक प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर आहे. हे आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असून त्याचे सौर वस्तुमान २६ लक्ष आहे.[११]
शोध मोहीम
न्यू होरायझन्स अंतराळयान सध्या २०१६ मध्ये सूर्यमालेच्या बाहेर जात आहे, जे आता पृथ्वीवरून धनूच्या दिशेला दिसते.[१२] इतर कुठल्याही ताऱ्याच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच न्यू होरायझन्सचे रेडिओआयसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर इंधन संपेल. १५ ऑगस्ट १९७७ साली जेरी एहमन यांना अरुंद रेडिओ बॅंडमध्ये मिळालेला तीव्र असा वॉव! सिग्नल धनू तारकासमूहाच्या दिशेने आला होता.
दंतकथा
ग्रीक दंतकथा
ग्रीक पुराणकथेनुसार चिरॉन हा सॅटर्नचा (शनीचा) मुलगा कुशल धनुर्धर होता. हर्क्युलसच्या विषारी बाणाने त्याला मृत्यू आल्यावर ज्युपिटरने (गुरूने) त्याला आकाशात तारापद दिले. तो आकाशात वृश्चिकावर बाण रोखून आहे. चिरॉन म्हणजे बैल मारणारा असेही समजतात, कारण धनू रास उगवते तेव्हा वृषभ (बैल) राशीतील तारे मावळतात.<ref>ठाकूर अ. ना. "धनु". मराठी विश्वकोश. खंड ७.
स्रोत
संदर्भ
- ^ James B. Kaler, Prof.
- ^ चार्ट्रंड ३, मार्क आर. स्काय गाईड: अ फील्ड गाईड फॉर ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स (इंग्रजी भाषेत). New York, NY. p. १८४.
- ^ a b c बेकर, डेव्हिड. द हेन्री होल्ट गाईड टु ॲस्ट्रॉनॉमी (इंग्रजी भाषेत). New York, NY. p. १३२.
- ^ a b Wilkins, Jamie; Dunn, Robert. 300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe (इंग्रजी भाषेत). Buffalo, New York.
- ^ लेव्ही २००५, पान. १०८.
- ^ लेव्ही २००५, पान. १०३.
- ^ लेव्ही २००५, पान. ११४.
- ^ "फर्स्ट ग्लोब्युलर क्लस्टर आऊटसाईड द मिल्की वे" (इंग्रजी भाषेत). 9 November 2011 रोजी पाहिले.
- ^ "Dramatic Outburst Reveals Nearest Black Hole" (इंग्रजी भाषेत). 30 August 2008 रोजी पाहिले.
- ^ A Black Hole in the Superluminal Source SAX J1819.3-2525 (V4641 SGR), 2001: "Finally, we find a distance in the range 7.40 ≤ d ≤ 12.31 kpc (90% confidence), which is at least a factor of ≈ 15 larger than the initially assumed distance of ≈ 500 pc."
- ^ Levy 2005, पान. 143.
- ^ "संग्रहित प्रत". 2016-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-14 रोजी पाहिले.