राज बब्बर

राज बब्बर
राज बब्बर
जन्म राज बब्बर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

राज बब्बर (जन्म : टुंडला-उत्तर प्रदेश, २३ जून १९५२ - हयात) हे हिंदी भाषेमधील चित्रपटअभिनेते व भारतीय राजकारणी आहेत.

सन १९८० च्या दशकात राज बब्बर बाॅलिवुडचे चमकते सितारे होते. एकूण ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले.

पूर्वायुष्य

राज बब्बर यांच्या वडिलांचे नाव कुशलकुमार बब्बर आणि आईचे शोभा बब्बर. त्यांना किशन आणि विनोद हे दोन भाऊ आणि अंजू नावाची एक बहीण आहे.

राज बब्बर यांचे शिक्षण आग्ऱ्याच्या फैजे-आम काॅलेजात झाले. आग्रा काॅलेजातून पदवी घेतल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून अभिनयाची आणि नंतर चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवीही घेतली. त्यानंतर ते दिल्लीहून मुंबईला स्थलांतरित झाले.

चित्रपटीय कारकीर्द

राज बब्बर यांनी सुरुवातीलाच त्या काळची प्रसिद्ध नटी रीना राॅय बरोबर पहिली भूमिका केली. 'इन्साफ का तराजू' या चित्रपटानंतर राज बब्बर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यानंत ते बी.आर. चोपडा यांचे खास अभिनेते झाले. त्यांनी हिंदी-पंजाबीसह एकूण २००हून अधिक चित्रपटांत काम केले.

२००पैकी काही चित्रपट

  • आप जैसा कोई नहीं
  • इन्सानियत के दुष्मन
  • इन्साफ का तराजू
  • उमराव जान
  • अौलाद के दुष्मन
  • काल्का
  • जीने नहीं दूंगा
  • दौलत
  • निकाह
  • बाॅडीगार्ड
  • माटी मांगे खून
  • सौ दिन सास के

राजकीय कारकीर्द

एप्रिल १९९४मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी राज बब्बर यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनवले. पुढे सन १९९९मध्ये १३व्या व २००४ साली १४व्या लोकसभेत ते निवडून गेले. परंतु त्याकाळी बलशाली असलेल्या अमरसिंह या समाजवादी नेत्याशी जुळवून त्यांना घेता आले नाही. २००६ साली राज बब्बर यांनी समाजवादी पार्टी सोडली आणि ते २००८ साली काँग्रेस पक्षात आले. २००९मध्ये राज बब्बर काँग्रेसच्या तिकिटावर १५व्या लोकसभेत निवडून गेले व मार्च २०१५मध्ये ते परत राज्यसभेवर निवडले गेले. सध्या २०१८ साली ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

कौटुंबिक आयुष्य

राज बब्बर यांनी १९७५मध्ये नादिराशी लग्न केले आणि नंतर स्मिता पाटीलशी. त्यांना पहिल्या बायकोपासून जूही व आर्य ही मुले आणि स्मिता पाटीलपासून प्रतीक झाला. याच बाळंतपणात स्मिता पाटील वारल्या.

पुरस्कार

राज बब्बर यांना पहिल्यांदा 'इन्साफ का तराजू'साठी आणि नंतर अणखी चारवेळा फिल्मफेअरचे नाॅमिनेशन मिळले, पण ॲवाॅर्ड मिळाले नाही.