विंडोज ८

उदयोन्मुख लेख
हा लेख २४ जून, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१२चे इतर उदयोन्मुख लेख
विंडोज ८
मायक्रोसॉफ्ट विंडोज चा एक भाग
विंडोज ८ च्या उत्पादनासाठीच्या आवृत्तीची झलक (बिल्ड ९२००)
विकासक
मायक्रोसॉफ्ट
संकेतस्थळ विंडोज ८
प्रकाशन दिनांक ऑक्टोबर २६, २०१२ (माहिती)
परवाना प्रताधिकारित व्यापारी संचलन प्रणाली
केर्नेल प्रकार हायब्रिड
प्लॅटफॉर्म समर्थन आयए-३२, एक्स८६-६४, एआरएम
पूर्वाधिकारी विंडोज ७
समर्थन स्थिती
अप्रकाशित
अधिक वाचन
  • विंडोज ८ मधील नवीन सुविधा
  • विंडोज ८ च्या आवृत्त्या
  • विंडोज स्टोर


विंडोज ८ (रोमन लिपी: Windows 8) ही मायक्रोसॉफ्ट विंडोजची सर्वांत नवीन आवृत्ती असून ती विंडोज ७ची पुढची आवृत्ती आहे. तिच्यामध्ये मायक्रोसॉफ्टने मेट्रो शैलीची सदस्य व्यक्तिरेखा वापरण्यात आली असून ती स्पर्शपटलासाठी बनवण्यात आली आहे. तिच्यामध्ये एआरएम प्रक्रियाकारासाठी समर्थनही आहे. तिच्या सर्व्हरसाठीच्या आवृत्तीला विंडोज सर्व्हर २०१२ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. अधिकृत स्रोतांच्या माहितीनुसार तिची पूर्ण झालेली आवृत्ती ऑक्टोबर, इ.स. २०१२ मध्ये प्रकाशित होणार आहे. तिची अधिकृत पण तात्पुरती आवृत्ती प्रकाशन पूर्वावलोकनासाठी असून ती मे ३१, इ.स. २०१२ मध्ये प्रकाशित झाली होती.

विकासप्रक्रिया

आरंभीच्या घोषणा

विंडोज ८ एआरएम मध्ये लघुप्रक्रियाकारासाठी समर्थन दिले जाईल, असे कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) मध्ये मायक्रोसॉफ्टने जानेवारी, इ.स. २०११मध्ये जाहीर केले होते.

जून १, इ.स. २०११ या दिवशी मायक्रोसॉफ्टने अधिकृतरीत्या विंडोज ८ व तिच्या काही नवीन सुविधांचे अनावरण तैपेई (तैवान) येथील तैपेई कंप्युटेक्स २०११ च्या वेळी मायकेल अ‍ँग्युलो यांनी, आणि कॅलिफोर्नियातील डी९ संमेलनात, ज्युली लार्सन-ग्रीन व मायक्रोसॉफ्टचे विंडोज अध्यक्ष स्टीव्हन सिनोव्हस्की यांनी केले.

ऑगस्ट १५, इ.स. २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने "विंडोज ८ बनवताना" (इंग्लिश: Building Windows 8, बिल्डिंग विंडोज ८) हा ब्लॉग विकासकांसाठी व वापरकर्त्यांसाठी उघडला.

फुटलेल्या मुख्य आवृत्त्या

  • एक ३२-बीट मुख्य आवृत्ती १, बिल्ड ७८५०, २२ सप्टेंबर, इ.स. २०१०ची तारीख असलेली आवृत्ती बीटाअर्काइव्ह येथे फुटली. तिच्यामध्ये विंडोज एक्सप्लोररसाठी रिबन व्यक्तिरेखा, एक मॉडर्न रीडर (आधुनिक वाचक) हा पीडीएफ वाचक, अद्ययावत केलेला व मॉडर्न टस्क मॅनेजर (आधुनिक कार्य व्यवस्थापक) हा कार्य व्यवस्थापक व नेटिव्ह आयएसओ चित्र माउंटिंग ह्या नवीन सुविधा होत्या.
  • एक ३२-बीट मुख्य आवृत्ती २, बिल्ड ७९२७ ही ऑगस्ट २९, इ.स. २०११ रोजी पायरेटबे येथे फुटली. तिच्यातील सुविधा बिल्ड ७८५५ सारख्याच होत्या.
  • एक ३२-बीट मुख्य आवृत्ती २, बिल्ड ७८५५ ही बीटाअर्काइव्ह येथे एप्रिल २५, इ.स. २०११ रोजी फुटली. तिच्यात नवीन प्रकारचा सदस्यप्रवेश व प्रोटोगॉन ही नवीन संचिका प्रणाली होती. ती आज आरइएफएस म्हणून ओळखली जाते व ती फक्त सर्व्हरच्या आवृत्त्यांनाच उपलब्ध आहे.
  • एक मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९७१ ही मायक्रोसॉफ्टच्या जवळच्या सहभागकर्त्यांना मार्च २९, इ.स. २०११ रोजी उपलब्ध करून देण्यात आली व ती प्रचंड सुरक्षेखाली ठेवण्यात आली होती. तरीही, अगदी थोड्या झलका प्रसारित झाल्या. चौकटींमधील बंद करा, मॅक्झिमाइझ, मिनिमाइझ ही बटने काढून टाकण्यात आली व केवळ "ओके", "कॅन्सल" अशांसारखीच बटने ठेवण्यात आली.
  • एक ६४-बिट मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९८९ ही झलका एमडीएल (माय डिजिटल लाइफ) येथील मंचांवर प्रकट झाल्यावर विन७व्हिस्टा येथे जून १८, इ.स. २०११ रोजी फुटली. एसएमएस सुविधा, आभासी कळफलक, नवीन सुरू होतानाचे पटल, मूलभूत थीममध्ये पारदर्शकता, आपण कुठे आहोत हे सांगणाऱ्या सुविधा, हायपर-व्ही ३.० व पॉवरशेल ३.० या बिल्डमध्ये होत्या.

विकासकांसाठी पूर्वावलोकन व बिल्ड संमेलन

बिल्ड विकासक संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर १३, इ.स. २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ च्या नवीन सुविधांचे अनावरण केले. मायक्रोसॉफ्टने एक विकासक पूर्वावलोकनही (बिल्ड ८१०२) ते उतरवून घेऊन व काम करायला सुरुवात करण्यासाठी विकासक समुदायासाठी प्रकाशित केले. या विकासक पूर्वावलोकनात "मेट्रो शैलीतील ॲप्स" बनवण्यासाठीची साधने, उदा. मेट्रो शैलीतील कार्यक्रमांसाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज एसडीके, विंडोज ८ विकासक पूर्वावलोकनासाठी मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडियो ११ एक्सप्रेस व मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन ब्लेंडर ५ विकासक पूर्वावलोकन होते. मायक्रोसॉफ्टच्या अनुसार विकासक पूर्वावलोकन त्याच्या प्रकाशनानंतरच्या पहिल्या १२ तासांत ५,००,००० पेक्षा जास्त वेळा उतरवले गेले. विकासक पूर्वावलोकनाने सुरुवात पटल (इंग्लिश: Start screen, स्टार्ट स्क्रीन) सादर केला. सुरुवात हे बटन विकासक पूर्वावलोकनामध्ये सुरुवात पटल दाखवते.

फेब्रुवारी १६, इ.स. २०१२ रोजी मायक्रोसॉफ्टने विकासक पूर्वावलोकनाचा शेवट होण्याचा दिनांक पुढे ढकलून तो ११ मार्च, इ.स. २०१२ च्या ऐवजी १५, इ.स. जानेवारी २०१३ केला.

ग्राहक पूर्वावलोकन व सार्वजनिक बीटा

फेब्रुवारी २९, इ.स. २०१२ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ची ग्राहक पूर्वावलोकन आवृत्ती (बिल्ड ८२५०) सादर केली. विंडोज ९५ पासून प्रथमच स्टार्टचे बटन कार्यपट्टीवर उपलब्ध नसून, ते पटलाच्या खालच्या भागातील उजव्या भागातील शोभापट्टी (Charm bar) वर आहे. विंडोजचे अध्यक्ष स्टीव्हन सिनोव्हस्की यांनी सांगितले की विकासक पूर्वावलोकन प्रकाशित झाल्यापासून १,००,०००हून जास्त बदल करण्यात आले आहेत. ग्राहक पूर्वावलोकन प्रकाशित झाल्यापासून त्याच्या पहिल्या दिवशी ते दहा लाखांहून जास्त वेळा उतरवून घेण्यात आले. विकासक पूर्वावलोकनाप्रमाणेच ग्राहक पूर्वावलोकनही १५ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी संपणार आहे.

प्रकाशन पूर्वावलोकन

जपानच्या विकासक दिन सभेत स्टीव्हन सिनोव्हस्की यांनी विंडोज ८ प्रकाशन पूर्वावलोकन (बिल्ड ८४००) जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित केले जाईल असे घोषित केले. मे २८, इ.स. २०१२ रोजी चिनी भाषेतील विंडोज ८ प्रकाशन पूर्वावलोकन आंतरजालावर विविध चिनी व बिटटोरन्ट संकेतस्थळांवर फुटले. मे ३१, इ.स. २०१२ रोजी मायक्रॉसॉफ्टने विंडोज ८ प्रकाशन पूर्वावलोकन सर्वांसाठी प्रकाशित केले. प्रकाशन पूर्वावलोकनात क्रीडा, प्रवास व बातम्यांसंबंधीच्या ॲप्सची भर, इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये फ्लॅश प्लेयरची भर इ. नवीन सुविधा आहेत.

नवीन सुविधा

मेट्रो व्यक्तिरेखा

विंडोज ८ ही मेट्रो रचना भाषेवर आधारित नवीन व्यक्तिरेखा वापरणार आहे. मेट्रो पर्यावरण विंडोज फोन प्रणालीवर आधारित असलेला फरशा-आधारित सुरुवात पटल सादर करेल. प्रत्येक फरशी एका ॲप्लिकेशनचे प्रतिनिधित्व करेल, व ती त्या ॲप्लिकेशनसंबंधीची माहिती दाखवू शकेल, उदा. विपत्र ॲप न वाचलेल्या संदेशांची यादी दाखवेल किंवा हवामान ॲप सध्याचे तापमान दाखवेल. मेट्रो शैलीतील ॲप्लिकेशन संपूर्ण पटल व्यापतात, व ती एकमेकांमध्ये "कॉन्ट्रॅक्ट्स" वापरून माहितीचे आदानप्रदान करू शकतात. ते फक्त विंडोज स्टोअरमध्येच उपलब्ध असतील. मेट्रो शैलीतील ॲप्लिकेशने विंडोज रनटाइम प्लॅटफॉर्मद्वारे अनेक प्रोग्रामिंग भाषांमध्ये विकसित केली जातात, उदा. सी++, व्हिज्युअल बेसिक, सी# व एचटीएमएल किंवा जावास्क्रिप्ट.

डेस्कटॉप[मराठी शब्द सुचवा] ॲप्लिकेशन चालण्यासाठी पारंपरिक डेस्कटॉप पर्यावरण मेट्रो ॲपसारखे वापरले गेले आहे. सुरुवात कळ कार्यपट्टीतून काढून ती शोभापट्टीत खाली उजव्या भागात स्थलांतरित करण्यात आली आहे. ती सुरुवात पटल उघडते.

इतर सुविधा

  • इंटरनेट एक्सप्लोरर १० मध्ये दोन आवृत्त्या असतील. त्यांतले एक मेट्रो शैलीतील ॲप प्लगइन[मराठी शब्द सुचवा] व ॲक्टिव्हएक्स घटकांबरोबर चालणार नाही.
  • विंडोज लाइव्ह आयडीने प्रवेश करण्याची मुभा. यामुळे वापरकर्त्याची रूपरेखा व सेटिंग्ज ही आंतरजालावर अन्यत्र विंडोज ८ वापरणाऱ्या इतर संगणकांना उपलब्ध होऊ शकेल.
  • यूएसबी ३.० समर्थन
  • नवीन लॉक पटल
  • नवीन विंडोज कार्य व्यवस्थापक रचना

हार्डवेर आवश्यकता

मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार विंडोज ८ ग्राहक पूर्वावलोकन विंडोज ७ साठीच्या हार्डवेरवर उत्तम चालू शकते. प्रणालीसाठीच्या खालील जरुरी गोष्टी अंतिम प्रकाशनापर्यंत बदलू शकतात.

विंडोज ८ च्या ग्राहक पूर्वावलोकनासाठी लागणाऱ्या किमान आवश्यकता
स्थापत्य एक्स८६ (३२-बिट) एक्स८६-६४ (६४-बिट)
प्रक्रियाकार १ गिगाहर्ट्‌झ
स्मृती (रॅम) १ जीबी २ जीबी
आलेख कार्ड डायरेक्टएक्स ९ आलेखीय उपकरणासोबत डब्ल्यूडीडीएम १.० किंवा वरची श्रेणी
हार्ड डिस्क मुक्त जागा १६ जीबी २० जीबी

टॅब्लेट्स / परिवर्तनीय

टॅब्लेट्‍स व परिवर्तनीय संगणकांमध्ये विंडोज ८ वापरण्याकरिता लागणाऱ्या किमान आवश्यक हार्डवेरची यादी मायक्रोसॉफ्टने प्रसिद्ध केली आहे.

  • हार्डवेर बटणे: टॅब्लेट व परिवर्तनीय संगणकांना 'पॉवर', 'रोटेशन लॉक', 'विंडोज कळ', 'आवाज कमी' व 'आवाज जास्त' ही पाच हार्डवेर बटणे असणे आवश्यक आहे. विंडोज कळ किमान १०.५ मिमी व्यासाची असावी.
  • ५-बिंदू अंकरूपके: मायक्रोसॉफ्टने सांगितल्याप्रमाणे विंडोज ८ स्पर्श संगणकांना किमान ५ स्पर्श बिंदूंना समर्थित करण्यासाठी अंकरूपके वापरणे आवश्यक आहे.
  • ब्रॉडबॅन्ड: टॅब्लेट जर भ्रमणध्वनी ब्रॉडबॅन्डशी जोडली असेल तर जीपीएस रेडियो आवश्यक आहे.
  • छायाचित्रक: किमान ७२० पिक्सेल

सुरक्षित बूट

सुरक्षित बूट ही यूईएफआय-आधारित अनधिकृत फर्मवेअर, संचालन प्रणाली रोखण्यासाठी असलेली वादग्रस्त सुविधा आहे.

चिन्ह

फेब्रुवारी १८, इ.स. २०१२ रोजी मायक्रोसॉफ्टने सांगितले की विंडोज ८ चे चिन्ह हे नवीन मेट्रो रचना भाषेला अनुसरून असेल. आधीचे झेंड्याच्या आकाराचे चिन्ह बदलून ते खिडकीच्या शिशात बदलले गेले असून ते संपूर्ण चिन्ह एकाच रंगात दाखवले जाईल.

आवृत्त्या

मुख्य लेख: विंडोज ८ च्या आवृत्त्या

एप्रिल १६, इ.स. २०१२ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ च्या चार आवृत्त्या असतील असे घोषित केले.

बाह्य दुवे