पन्हाळा
पन्हाळा | |
![]() तीन दरवाजा येथील आतील द्वार, इ. स.cf १८९४,पन्हाळा | |
नाव | पन्हाळा |
उंची | ४०४० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | कोल्हापूर, महाराष्ट्र |
जवळचे गाव | {गाव} |
डोंगररांग | कोल्हापूर |
सध्याची अवस्था | {अवस्था} |
स्थापना | {स्थापना} |
कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्यांचे महत्व सांगताना कौटिल्य लिहतो, 'भुईकोट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पाणकोट किल्लापेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रात गिरीदुर्गांची संख्या फार मोठी होती व आहे.[१]
भौगोलिक स्थान
पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस २१ कि. मी. अंतरावर आहे. पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश १६.४८° व पूर्व रेखांश ७४.८° यावर वसलेले आहे. याची कोल्हापूर पासूनची उंची ७०० फूट असून, पन्हाळाच्या पायथ्यापासूनची उंची २७५ फूट आहे. या गडाचा घेर ४२ मैलाचा आहे. गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांभा खडक फोडून ३२ फूटापर्यंत तयार केली आहे. काही ठिकाणी तो १५ ते ३० फूट उंचीची दगडानी बांधलेली तटबंदी आहे." तटाची रुंदी सर्वसाधारणपणे ५ फूट आहे, पण दरवाजे व माऱ्याच्या टापूत येणारा विभाग या ठिकाणी ती १५ फूट रुंदीची ठेवण्यात आली आहे. अशा ठिकाणी आत एक व बाहेर एक असे दुहेरी तट आहेत. डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पाण्याची. पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला हा उभारला जातो. पन्हाळगडाच्या भागात पाण्याच्या सोयी चांगल्या आहेत. कारण, या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेस कासारी व भोगावती या नद्यांनी हा भाग वेढलेला आहे. त्याचप्रमाणे पन्हाळगडावर 'सादोबा तलाव' व 'सोमाला तलाव' हे अदिलशहाच्या काळात बांधण्यात आले होते. तसेच पन्हाळयावर अनेक विहीरी आहेत यात उल्लेखनीय विहीरी 'कर्पुर बाव' (अश्वलायन तीर्थ), 'अंधार बाव' (श्रीनगर / शृंगारबाव), श्री सभाजी मंदीरातील विहीर इत्यादी आहेत. त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नसे व आजही भासत नाही.[२]
पन्हाळगडाची विविध नावे
पन्हाळगड हा वेगवेगळया राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गडाची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळतात. पन्हाळगडाचे पुराणकाळातील नाव 'ब्रम्हगिरी' असे होते. यापाठीमागची दंतकथा अशी सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने प्रजा उत्पन्न 'करण्याच्या हेतूने येथे 'सोमेश्वर लिंग' व 'सोमेश्वर सरोवर' निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव 'ब्रम्हगिरी' असे पडले. तसेच आणखी एक दंतकथा सांगितली जाते की, पन्हाळगडावर पराशर ऋषीनी उग्र तपश्चर्या केली. या तपश्चर्येत इंद्रराजाच्या सुचनेवरून नागांनी तपश्चर्येत विघ्ने आणली म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला. परंतु नाग शरण आल्याने त्यांनी शाप मागे घेतला, तेंव्हापासून हे ठिकाण नागांचे स्मरणार्थ 'पन्नगालय' (पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर) यावरून या गडास 'पन्नगालय' असे नाव पडले. जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव 'प्रणालक' किंवा 'पद्मनाल' असे आले आहे. यातून 'पनाला' शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव 'शहानबी- दुर्ग असे ठेवले होते. पुढे शिवाजी महाराजांच्याकडे या गडाचा ताबा आल्यावर तो 'पन्हाळा' या नावाने ओळखला जात होता. शिवकाळातील भूषन कवीने आपल्या काव्यात यास 'परनालगड' असे म्हणले आहे. ग्रैंडप च्या वर्णनात पन्हाळगडाचा उल्लेख 'पनाला' असा करण्यात आला आहे. तर मेजर ग्रॅहमने पन्हाळगडाचा उल्लेख 'पनाला' किंवा 'पुनाला' असा केला आहे.[३][४]
पन्हाळा किल्ल्याचे महत्त्व
- हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे.
- हा किल्ला शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी संबंधित आहे.
- हा किल्ला एक भव्य आणि मजबूत किल्ला आहे.
- हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
इतिहास
पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकीर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. व पाली भाषेतील आहे.येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला.
मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.
६ मार्च १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
कसे जाल?
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/mr/thumb/a/a5/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.jpg/220px-%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE.jpg)
चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजामार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
- राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.
- सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.
- राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
- अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती.
- चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच "शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.
- सोमाळे तलाव - गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्र मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती.
- रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी - सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
- रेडे महाल- याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
- संभाजी मंदिर- ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
- धर्मकोठी- संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
- अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
- महालक्ष्मी मंदिर- राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
- तीन दरवाजा- हा पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.
- बाजीप्रभूंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.
गडावरील राहायची सोय
गडाच्या जवळपास राहण्यासाठी निवासस्थाने व हॉटेल्स आहेत.
गडावरील खाण्याची सोय
जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते. येथील झुणका-भाकरी सुप्रसिद्ध आहे .
जाण्यासाठी लागणारा वेळ
कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा kmt बस स्टॅंड येथुन kmt बस मधुन पन्हाळा तीन दरवाजा येथे अर्ध्या तासात पोहचते .
पन्हाळा या पिकनिक पॉइंटला यायचे असे :
कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल उद्यानापासून २२ किलोमीटर इतके पन्हाळगडाचे अंतर आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानकातून दर ४५ मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. त्यासाठी प्रतिमाणसी २६ रुपये तिकीट आहे. शहरातून खासगी वाहन करून गेल्यास एक ते दीड हजार रुपये खर्च येईल. कोल्हापूरमधून अंतर : २३ किलोमीटर व जाण्यासाठी लागणारा वेळ ४० मिनिटे. राहण्याची सोय आहे. गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. एक दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे.
गडाबद्दलची माहिती : पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोठी, नायकिणीचा सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, तीन दरवाजा, पांडवदरा, सोमेश्वर तलाव, आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजीने बहरलेला असून येथील वातावरण आल्हाददायक असते. सह्याद्री पर्वताच्या कुशीत माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्षे येथेच ठेवली होती.
चित्रदालन
-
छ. शिवाजी महाराज मंदिर (राजर्षी छ.शाहू महाराज स्थापित)
-
बाजी प्रभू देशपांडे पुतळा
-
तीन दरवाजातील आतील भाग
-
कलावंतीण महाल
-
तीन दरवाजा मधील एक दरवाजा
-
अंधार बाव (जमिनीखाली 2 मजले व वर एक)
-
अंधार बाव (जमिनीखाली 2 मजले व वर एक)
-
प्रवेशद्वार तीन दरवाजे
-
कमल पुष्प शिल्प अंकन
-
काली बुरुुज
-
अंबरखाना (धान्याचे कोठार)
संदर्भ
- ^ "डोंगरी किल्ले" (PDF). cultural.maharashtra.gov.in (Marathi भाषेत). 2 November 2022.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "प्रकरण पहिले - प्राचीन व मध्ययुगीन काळातील पन्हाळा" (PDF). ir.unishivaji.ac.in (Marathi भाषेत). 2 November 2022. 2 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 2 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "पराक्रमाच्या खुणा सांगतोय पन्हाळगड". महाराष्ट्र टाइम्स. 3 August 2013. 2 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 November 2022 रोजी पाहिले.
- ^ "कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स" (इंग्रजी भाषेत). 2013-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
नोंदी
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
- किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर
- गडदर्शन - प्र. के. घाणेकर
- गड आणि कोट - प्र. के. घाणेकर
- इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
- चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
- साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
- सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर
- मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर
- दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर
- गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर